भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचा सहकारी बूच विल्मोर हे तब्बल आठ महिन्यांपासून अंतराळात अडकून पडले आहेत. मात्र, आता त्यांचा पृथ्वीवरील परतीचा मार्ग मोकळा झाला आहे. स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलच्या मदतीने ते 19 मार्चपर्यंत पृथ्वीवर परततील.
फक्त आठ दिवसांच्या मोहिमेवर गेले पण आठ महिने अडकले!
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघे 5 जून 2024 रोजी बोईंगच्या स्टारलायनर कॅप्सूलमधून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर (ISS) गेले होते. ही मोहीम फक्त आठ दिवसांसाठी नियोजित होती, मात्र तांत्रिक बिघाडामुळे दोघे आठ महिन्यांपासून अवकाशात अडकले आहेत.बोईंगच्या स्टारलायनरमध्ये महत्त्वाच्या तांत्रिक समस्या आल्या होत्या. नासा आणि बोईंगने अनेक प्रयत्न केले, पण अंतराळयान सुरक्षित परत आणणे धोकादायक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. अखेर, एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीला ही जबाबदारी देण्यात आली.
डोनाल्ड ट्रम्प यांची एलन मस्क यांच्याकडे मदत मागणी
अमेरिकेचे नूतन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अंतराळात अडकलेल्या दोन अंतराळवीरांना परत आणण्यासाठी स्पेसएक्सच्या मदतीची मागणी केली. एलन मस्क यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच मोहिम राबवण्याची घोषणा केली आहे.स्पेसएक्स क्रू-9 मिशन अंतर्गत सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणले जाईल. मात्र, क्रू-10 अवकाशात गेल्यानंतरच क्रू-9 कॅप्सूल परत येऊ शकतो, त्यामुळे मार्च किंवा एप्रिल महिन्यात परतीची शक्यता वर्तवली जात आहे.
एलन मस्क यांचा जो बायडेन यांच्यावर निशाणा
एलन मस्क यांनी X (ट्विटर) वर पोस्ट करत सांगितले की, “डोनाल्ड ट्रम्प यांनी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी स्पेसएक्सला सांगितले आहे. दोघे गेल्या वर्षी जूनपासून अडकले आहेत.”यावेळी एलन मस्क यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडेन यांच्यावरही टीका केली. मस्क म्हणाले, “जो बायडेन यांनी अंतराळवीरांना इतक्या दिवस अडकवून ठेवणे हे भयानक होते. नासाने आधीच त्यांना परत आणण्यासाठी खूप वेळ घेतला आहे.”
डोनाल्ड ट्रम्प यांचे स्पेसएक्सला शुभेच्छा
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या Truth Social या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे की, “एलन मस्क आणि स्पेसएक्स लवकरच प्रयत्न सुरू करणार. मला आशा आहे की सर्वजण सुरक्षित असतील. शुभेच्छा एलन!”
सुनीता विल्यम्स यांना चालण्याचा विसर!
सुनीता विल्यम्स यांची प्रकृती गेल्या आठ महिन्यांत कमकुवत झाली आहे. काही दिवसांपूर्वी "पीपल मॅगझिन" ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “मी आता चालायलाही विसरली आहे! चालण्याचा अनुभव कसा असतो, हे मी आठवण्याचा प्रयत्न करत आहे.”
मार्च किंवा एप्रिलमध्ये परत येण्याची शक्यता
ऑगस्ट 2024 मध्ये नासाने स्पेसएक्सच्या मदतीने परतीच्या मोहिमेचे नियोजन सुरू केले होते. सध्या क्रू-9 कॅप्सूल परतीसाठी तयार आहे, पण तो क्रू-10 अवकाशात गेल्यानंतरच येऊ शकतो. त्यामुळे, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे मार्च किंवा एप्रिलमध्ये पृथ्वीवर परत येण्याची शक्यता आहे.
नासाची खात्री - अंतराळवीर सुरक्षित आहेत
अमेरिकन अंतराळ संस्था नासाने सांगितले आहे की, "सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि त्यांची तब्येत उत्तम आहे."मार्च किंवा एप्रिलमध्ये त्यांच्या पृथ्वीवरील पुनरागमनाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.